जळगाव शहर पुन्हा हादरले ; किरकोळ वादातून तरुणाचा चाकू भोसकून निर्घृण खून

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । जळगाव शहरात गुन्हेगारी वाढतच असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, शहर खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकू भोसकून निर्घृण खून केला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरात घडलीय. आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी होऊन धारदार शस्त्राने सपासप वार करून आकाश सुरेश सपकाळे रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव तरुणाचा निर्घृणपणे खून केला. यामध्ये मयताचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनांसाठी दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती.