जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच पाचोऱ्यातील शेवाळे येथे हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजेच खून झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून आरोपीने पोबारा केला आहे. जनाबाई माहरु पाटील असे मृत वृद्ध महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे मृत वृद्ध आपल्या मुलासोबत वास्तव्याला होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर, त्यांना आपली आई झोपलेल्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली.
मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन केले.आईची हत्या झाल्याचं लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. डॉग स्क्वॉडसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी श्वानाच्या मदतीने तपास सुरू केला. मात्र श्वान गावातच फिरलं. यामुळे आरोपी मारेकरी गावातीलच असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.