महापालिकेने त्या चार बाधितांचे पुन्हा घेतले नमुने
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । शहरात शुक्रवारी खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील तीन व्यक्ती एकाच कुटुंबातील असून त्यांना नाशिक येथील हिस्ट्री आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता चारही रुग्णांमधील व्हेरियंट तपासणी करण्यासाठी शनिवारी पुन्हा महापालिकेतर्फे नमुने घेऊन ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यासोबतच या रुग्णांच्या संपर्कातील २७ जणांचे नमुने घेण्यात आले असून यातील २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
सविस्तर असे की, शिवाजी नगरातील एकाच परिवारातील तीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले. तर साने गुरुजी नगरातील एक तरुण बाधित आढळून आला. त्यांच्या संपर्कातील २७ जणांची शनिवारी महापालिकेच्या पथकाने तपासणी केली. त्यात शिवाजी नगरातील १६ जणांची अँटिजेन व तीन जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. साने गुरुजी नगरातील सहा जणांची अँटिजेन तर दाेघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात अँटिजेन चाचणी केलेल्या २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.