जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. अल्पसंख्याक विभागाची धुरा सांभाळणाऱ्या नक्वी यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. Mukhtar Abbas Naqvi resigns for Modi cabinet
दरम्यान आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्वी यांचे कौतुक केले आणि मुख्तार अब्बास नक्वी यांचे देशाच्या विकासात विशेष योगदान असल्याचे सांगितले. भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारी यादीतून नक्वींचे नाव वगळण्यात आले होते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना केंद्रीय मंत्री केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कामकाज पाहू शकतात. मात्र त्याआधीच नक्वींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. नकवी यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून त्यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप त्यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे आता नक्वींना उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता वाढली आहे.