जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । यंदाच्या खरीप हंगामात मुगाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. जळगावात सोयाबीनचे दर घसरल्यानंतर आता मुगाचे भाव देखील घसरले आहेत.
जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती. शिवाय मुगाला मुबलक असा पाऊस झाल्याने चांगले उत्पादन येऊन दर देखील चांगला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आवक सुरु झाल्यानंतर लागलीच दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
दरम्यान मध्यंतरी सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुगाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी दोन दिवस पाऊस बंद होताच मूग काढणीचे काम केले होते. यामुळे चांगला मूग आला आहे. त्यानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मूगाची चांगली आवक सुरू झाली आहे.
मात्र बाजार समितीत मुगाची आवक होताच सोयाबीन पाठोपाठ मुगाचेही भाव कोसळले आहेत. सध्या जळगाव बाजार समितीत मुगाची मोठी आवक सुरू आहे. मुगाला हमीभाव ८ हजार ५५८ रुपये असताना सध्या चांगल्या दर्जाच्या मूगाला साडेसात तर साधारण गुणवत्तेच्या मूगाला साडेसहा हजारापर्यंत भाव मिळताना दिसत आहे.