⁠ 
शनिवार, मे 18, 2024

बैलगाडा शर्यतीचा विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा…आमदार चव्हाणांचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ ।  चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव येथे आयोजित बैलगाडा शर्यंत बंदी विरोधातील निषेध मोर्चात केला. हे आंदोलन म्हणजे सुरुवात असून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री यांनी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांसोबत बैठक घ्यावी व हा विषय गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेत भूमिका मांडावी अन्यथा राज्यातील सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधून आंदोलन करतील असा इशारा देखील आमदार चव्हाण यांनी दिला.

तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती बाबत कायदा केलेला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये कायदा केला नंतर कायद्याला काहींनी न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर राज्य शासनाने सदर केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र मागील तीन वर्षात (फेब्रुवारी २०१८ पासून अद्यापपर्यंत) कोणत्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे.

तामिळनाडू व मग कर्नाटक मध्ये याच धर्तीवर कायदा केलेला असून सुद्धा तेथील शर्यतीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बंदी घातलेली नाही, राज्य शासनाला बियर बार, डान्स बार सुरु करायला वेळ आहे, श्रीमंतांसाठी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती चालतात मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील संस्कृती टिकवणाऱ्या व गोवंश वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या बैलगाडा शर्यती का खुपतात असा सवाल करत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव येथे आयोजित बैलगाडा शर्यंत बंदी विरोधातील निषेध मोर्चात केला.

हजारो बैलगाडा चालक मालक, शेकडो शर्यतीचे सर्जा – राजा बैल यांच्या उपस्थितीत या निषेध मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती येथून स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तेथून तितूर नदीवरील नवीन पूल मार्गे तहसील कचेरी हून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे हजारोंच्या संखेने आंदोलक जमलेले असूनही कुठल्याही प्रकारच्या रहदारीला अडथळा न होऊ देता हा मोर्चा संपन्न झाल्याने शहर वासियांनी देखील आंदोलकांचे कौतुक केले. ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ ‘ बैलगाडा शर्यत सुरु झालीच पाहिजे’ अश्या घोषणा देत, डफ, ढोलकी वाजवत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला मोर्चाला नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर आदी तालुक्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते.

मखमलाबाद नाशिक येथील येथील मोतीराम अप्पा पिंगळे, खडकजाम नाशिक शांताराम तात्या पगार, राजू महाले अंतुर्ली, गणेश थेठे पालखेड नांदूर, किशोर गांगुर्डे, नांदगाव येथील राजू महाजन, नारायण सीताराम सोनवणे, हिंगणे देहरे नांदगाव, मल्हारी एरंडे कासोदा, ळीसगाव आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देसी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो. यासाठी शेतकरी शासनाकडे अनुदान मागत नाही. बैलांच्या प्रदर्शन व शर्यतीवरील बंदी मुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती आहे. तसेच शर्यत बंदी मुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व आंदोलकांनी एकत्र येत बैलांचे रिंगण घालत उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी मोतीराम अप्पा पिंगळे, खडकजाम नाशिक शांताराम तात्या पगार यांनी आपले मनोगत व्यक्त करत बैलगाडा चालक, मालक यांच्या भावना मांडल्या तर भाजपा युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, विशाल पाटील, विशाल धनगर यांनी आंदोलनाला सर्व तरुण वर्गाचा पाठींबा असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. आंदोलनाची सांगता तहसिलदार यांना बैलगाडा शर्यत मालक चालकांचे निवेदन चाळीसगावचे तहसिलदार यांना देऊन करण्यात आली.