जळगाव लाईव्ह न्यूज । शिक्षण क्षेत्रात आता एक मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. शालेय दस्तऐवजांमध्ये केवळ वडिलांच्या नावाचे वर्चस्व आता संपणार असून, नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात ‘आईचे नाव’ समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘सन्मान माऊलीचा’ या विशेष उपक्रमांतर्गत हा बदल लागू होणार आहे.

आतापर्यंत शालेय दस्तऐवजांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावानंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव असा क्रम असायचा. मात्र आता नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे नाव, त्यानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा नवीन क्रम लागू होणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात स्वतःची ओळख सांगतानाही हाच क्रम पाळावा लागणार आहे.

जन्म दाखल्यावर आईच्या नावाचा उल्लेख असतो, मात्र शाळेत प्रवेश घेताना तो मागे पडतो. हा बदल केवळ कागदोपत्री नसून स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. मुलांच्या जडणघडणीत आईचा वाटा मोठा असतो, त्याला अधिकृत ओळख मिळेल, असे शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी सांगितले.
हा निर्णय केवळ शाळांपुरता मर्यादित नाही. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्यांवरही आईच्या नावाचा उल्लेख बंधनकारक करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेला हा प्रयोग आता जळगाव जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू होत असला, तरी संपूर्ण शिक्षण क्षेत्रात म्हणजेच खाजगी शाळांसह याची प्रत्यक्ष आणि पूर्णतः अंमलबजावणी २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सध्या जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून हा बदल प्राधान्याने राबवला जात आहे. त्यादृष्टीने संस्थाचालकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.







