जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरणने (Mahavitaran) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेत घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्याटप्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौरऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्याने महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच सौरऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते एक रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणे महावितरणला शक्य झाले आहे.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये प्रती युनिट ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७२८ मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात एक रुपया सवलत देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर एक एप्रिलपासून ही सवलत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
घरगुती ग्राहकांना टीओडी
कोणत्या वेळी वीज वापरली त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत ‘टीओडी’ म्हणतात. ही सुविधा केवळ उद्योगांना होती पण आता ती उद्योगधंद्यांच्या सोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरात मिक्सर, इस्त्री, वॉशिंग मशिन, ओव्हन इत्यादींना मोठ्या प्रमाणात वीज लागते. या उपकरणांचा वापर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्याचे नियोजन केले तर घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभघेता येईल. उन्हाळ्यात दिवसा पंखे, कूलर आणि एसी यांचा वापर वाढतो. त्यावेळीही ग्राहकांना टीओडी सवलतीचा अधिक उपयोग होईल.