या कारणामुळे मूग व उडीदला व्यापाऱ्यांकडून मिळतोय कमी दर, असे आहेत दर..

सप्टेंबर 15, 2024 5:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । यंदा मान्सून पाऊस आतापर्यंत चांगला बरसला आहे. यामुळे कापसासह काही पिके चांगली आलीय. मात्र अतिपावसामुळे मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. यातच खरीप हंगामातील मूग व सद्य:स्थितीत उडीदचा नवीन माल आता बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र, माल ओला असल्याकारणाने ओला माल खरेदी करण्यास व्यापाऱ्यांकडून नकार दिला जात आहे; तर काही व्यापाऱ्यांकडून कमी दरात हा माल खरेदी केला जात आहे.

mungudit

हमीभाव चांगला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाएवढा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, शासनाकडून मूग व उडिदाची शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरवर्षी, शासनाकडून हंगाम संपल्यानंतर व मालाची जवळपास विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होत नाही. शेतकऱ्यांकडील मालाची विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास त्या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होतो. त्यामुळे शासनाने सप्टेंबर महिन्यातच खरेदी केंद्रे सुरू करावीत अशी मागणी होत आहे.

मूग, उडदाच्या उत्पादनात घट
गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे मान्सूनची स्थिती बदलली आहे. या बदललेल्या स्थितीमुळे सर्वाधिक फटका हा शेतीला बसत आहे. विशेषकरून खरीप हंगामात मूग व उडीद या पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. जिल्ह्यात मूग व उडदाची लागवड कमी होत आहे. त्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये मूग व उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा लागवडीसोबतच उत्पादनात घट झाली आहे.

असे आहेत दर
धान्य दर
उडीद- ५५०० ते ७ हजार ४००
मूग – ५ हजार ते ८ हजार ५००
मका – २५०० ते २८००
सोयाबीन – ४४०० ते ४४५०
ज्वारी – २४०० ते २५००

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now