जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । देशात मान्सूनच्या आगमनानंतर आता तो त्याच्या पुढच्या प्रवासाकडे वाटचाल करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातील इतर भागात पुढील आठवडाभर मान्सून दाखल होईल.
केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आधीच व्यक्त केला आहे. यंदा 106 टक्के पाऊस यंदा अपेक्षित आहे, तर उत्तर-पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. IMD ने 29 मे रोजी जाहीर केले होते की नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे.
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे