⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

शेतकऱ्यांसाठी गुडनूज! नैऋत्य मान्सूनने धरला वेग ; महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होईल दाखल?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२३ । मान्सूनची शेतकरीसह सर्वसामान्यन नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनचा पहिला पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना आहे. अशातच हवामान खात्याकडून आनंदाची बातमी समोर आली असून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. Monsoon Update News

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच 1 जून रोजी मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर 5 जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.

15 जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा 8 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनच्या पुढे सरकण्यामुळे पुढील 5 दिवस संपूर्ण वायव्य भारतात 50-70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. इतकंच नाहीतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर 1 ते 3 जून दरम्यान बिहारसह गंगेच्या मैदानी भागात उष्णतेची लाट येऊ शकते.