जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या पंधरा दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून जळगाव शहरासह जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार सरींचा अंदाज वर्तविण्यात आला असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांतही वादळी पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जळगावात तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
जळगाव शहरात रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी तुरळक सरी कोसळल्यानंतर मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता शहरासह परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. मात्र अद्यापही जळगावकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.
जळगावात पुढील चार दिवस असा आहेत अंदाज?
२३ जून : जळगाव जिल्ह्यात ढगाळ आकाश राहील. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
२४ जून : हा दिवस महत्त्वाचा असेल. जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता असून, मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे दिलासा मिळेल.
२५ जून : पावसात काहीशी घट होईल. ढगाळ हवामानासह तुरळक सरी येतील.
२६ जून : पाऊस तुरळक राहील. मात्र, या दिवसानंतर मान्सूनचा खरा जोर सुरू होईल.
दरम्यान, मागच्या दोन आठवड्यापासून मान्सून पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








