जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने सोमवारी (दि. 22) विशेष मोहीम राबविले. या मोहिमेत मद्यपी, टवाळखोर, अवैध वाहतूकदार आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई केली आहे. एकाच दिवसात केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांनी या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले होते. यात वाईन शॉपसमोर मद्यपान करणाऱ्या 5 जणांवर, तर मोकळ्या मैदानावर मद्यपान करणाऱ्या 41 जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय खाद्य स्टॉलसमोर मद्यपान करणाऱ्या 2 जणांविरोधातही कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि कॉलेज परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली. शाळा व महाविद्यालय परिसरात वेगाने वाहन चालविणे आणि कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या 16 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल, ढाबे, लॉजेस आणि ओयो हॉटेल्सची तपासणी करत 153 ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यासोबतच 19 कॅफेंची तपासणी करण्यात आली.
शाळा व महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर कोपटा (तंबाखूजन्य पदार्थ विक्री) प्रकरणी 71 कारवाया करण्यात आल्या. तसेच बीपी ॲक्ट कलम 110 व 112 अंतर्गत 44 प्रकरणे नोंदविण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत एमव्ही ॲक्ट 66/192 अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 7 वाहनांवर कारवाई केली. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 22 चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.
याशिवाय विविध वाहतूक नियमभंग आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी 681 प्रकरणे दाखल करण्यात आली असून, एकूण 5 लाख 16 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देत नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान टाळावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.








