जळगाव जिल्हा

जळगावच्या बाजार समितीत मूग आणि उडदाला मिळाला ‘इतका’ भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बाजार समितीत शेतमालाच्या लिलावात उडदाला चांगला भाव मिळाला आहे. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या जाहीर लिलावात उडदाला कमाल ८ हजार ४०० रुपये, तर मुगाला ८ हजार ३०५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे बाजार समितीत उडदाच्या भावाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

mug udid jpg webp

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा बाजार समिती प्रशासनाने लिलावाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. शेतमालाची चाळणी किंवा गाळणी न करता मॉइश्चर मीटरद्वारे केवळ आर्द्रता तपासून लिलाव केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची गुणवत्ता तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक सुलभता मिळत आहे.

लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समितीच्या अधिकृत इलेक्ट्रॉनिक भुईकाट्यावर मोफत वजनमाप करून देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती लक्ष्मण पाटील, उपसभापती जयराज चव्हाण आणि संचालक मंडळाने केले आहे.

ज्वारी, मका आणि बाजरीचे दर निश्चित

दरम्यान, शासनाने यंदा ज्वारी (संकरित), मका आणि बाजरीचे दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार ज्वारी (संकरित) ४ हजार २३ रुपये, मका २ हजार ४१० रुपये आणि बाजरी २ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १८ ठिकाणी खरेदी केंद्रे

शेतकऱ्यांना शासकीय दरानुसार शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात १८ ठिकाणी खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, पाळधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या केंद्रांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेले दर आणि बाजार समितीतील उपलब्ध सुविधांची माहिती घेऊन शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button