⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगावात शिवसेनाच शिवसेनेला संपविण्याच्या प्रयत्नात

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव मनपात शिवसेनेची सत्ता आली आणि मनपावर भगवा फडकला. शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्यानंतर बदल दिसण्यास सुरुवात झाली मात्र विकास अद्याप लांबच आहे. जळगाव मनपा, विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीने हा ‘गोल्डन चान्स’ असताना दूरदृष्टी नसल्याने शिवसेनाच शिवसेनेला संपविणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. जळगावातील शिवसेना एकसंघ असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात अंतर्गत गटबाजी आणि विकासाच्या इच्छाशक्तीचा अभाव मारक ठरतो.

जळगावात गेली अनेक वर्षे सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. सुरेशदादांच्या अभेद्य गडाला सुरुंग लावत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जळगाव मनपा काबीज केली. भाजपचे बस्थान नीट बसत नसल्याने शिवसेनेने संधी साधत भाजपचे नगरसेवक फोडून आपली सत्ता स्थापन केली. कधी नव्हे तर शिवसेनेचा भगवा मनपावर फडकला. सुरुवातीच्या काळात जल्लोषमय वातावरण, उत्साह असल्याने शिवसेनेचे दिग्गज नेते, पदाधिकारी मंडळी शहरात येऊन गेले. ‘नवरीचे नऊ दिवस’ त्याप्रमाणे पुढे सर्व हवेत विरले. जळगावात शिवसेनेचे जेष्ठ आणि दिग्गज पदाधिकारी कुठे हरवले कळलेच नाही. बऱ्याच दिवसांनी भाजपची साथ मिळाली आणि महासभेत कोटींची उड्डाणे घेत विकासकामांना मंजुरी मिळाली. कामे पूर्ण होणार की पुन्हा काही अडचण येणार यात अजूनही शंकाच आहे. शंकेला वाव म्हणजे अंतर्गत कुरघोडीचे राजकारण अधूनमधून समोर येते. शिवसेनेला स्वतःच्या नगरसेवकांसह भाजपच्या फुटीर नगरसेवकांनाही सांभाळण्याची दुहेरी कसरत करावी लागणार असून सध्या तरी त्यात शिवसेना कमी पडते आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघावर गेली अनेक वर्ष सुरेशदादा जैन यांचा एक छत्री अंमल होता. मोदी लाटेत त्यांच्या गडाला सुरुंग लावत सुरेश भोळे यांनी बाजी मारली. सलग दुसऱ्यांदा ते आमदार झाले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे चित्र मात्र काहीसे वेगळे आहेत. राज्यात सध्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. राज्यात सरकार असल्याने सहाजिकच त्याचा परिणाम मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीवर होणार हे निश्चित आहे. राज्यात शिवसेनेचे बळ वाढत असून जळगाव विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचे पारडे जड राहू शकते परंतु त्यासाठी आत्तापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. जळगाव शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांना शहराच्या राजकारणात फारसा रस नसल्याने पक्ष संघटन मजबूत करण्याकडे त्यांचा कल दिसत नाही. ‘गल्लोगल्ली शाखा आणि घरोघर कार्यकर्ता’ ही संकल्पना राबविण्यात पक्षश्रेष्ठी कमी पडत आहे. शिवसेनेकडून होत असलेली कामे जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नाही.

गेल्या काही महिन्यातील घडामोडी लक्षात घेता कार्यकर्त्यांची मोठी फळी, गट शिवसेनेत आला असे काहीही ऐकण्यास मिळाले नाही, उलटपक्षी शिवसेनेतील जुन्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी वारंवार समोर आली. अनेकांनी नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली, काही बाहेर पडले तर काहींनी इतर पक्षाची वाट धरली. जळगाव शहराचे जिल्हाप्रमुख हे अजूनपर्यंत विद्यापीठाच्या विचारातून बाहेरच पडले नाही किंबहुना त्यांना विद्यापीठ आणि शिवसेना दोघांची सांगड घालता आली नाही. महानगर प्रमुखांकडून नवीन कार्यकर्ते जोडण्याची, जुन्या शाखा मजबूत करण्याचे आणि पक्षाला एक नवी उंची गाठून दिल्याचे कार्य अजूनही साध्य झालेले नाही. गेल्या काही दिवसात युवासेनेच्या माध्यमातून अथवा युवा कार्यकर्त्यांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थिती देण्याचेच कार्य पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत.

शिवसेना हा एक मोठा पक्ष आणि विचार असून जिल्ह्यात सेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. शहरात शिवसेनेचे अनेक कट्टर कार्यकर्ते असून काही पदाची लालसा न ठेवता कार्य करीत आहे. काही महिन्यांपूर्वीच स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाची निवड करायची यावरून मतभेद निर्माण झाले होते. विराज कावडीया यांचे नाव निश्चित झाले परंतु त्यातही अडथळे आले. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवकपद अद्याप रिक्त असून त्याठिकाणी एखाद्याची नेमणूक करण्याचे सेनेला जमत नाही. एकीकडे भाजप पदाधिकारी इतरांच्या राजीनामा देण्याची वाट पाहत आहेत तर सेनेच्या गोटात रिक्त जागेवर अद्याप निवड होऊ शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यातील आणि प्रामुख्याने शहरातील शिवसेनेची मेजर बॉडी थंडबस्त्यात गेली आहे. जो आहे तो स्वतःची पोळी शेकून घेण्यात मस्त झाला असून पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्याचे ते विसरत आहे. युवासेनेचा टेकू घेऊन स्वतःचे नाव करून घेतले आणि ऐन निवडणुकीत युवकांचा पत्ता कट केला तर सेनेला मोठी किंमत मोजावी लागेल. शिवसेनेत अनेक दिग्गज आणि तज्ज्ञ पदाधिकारी आहेत. त्या सर्वांच्या नेतृत्वात मायक्रो नियोजन केले तर भविष्यात सेना जिल्ह्यात एक नवी उंची गाठेल किंवा आज आहे त्यापेक्षा वाईट परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागू शकते.

हे देखील वाचा :