जळगाव लाईव्ह न्यूज । विशेष । आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमेची घोषणा करत प्रत्येकाला घरावर तिरंगा(Indian Flag) फडकविण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी आपले डीपी बदलून त्या जागी तिरंगा ठेवला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फेसबुक (Facebook) आणि ट्विटरवर आपला डीपी बदललेला नाही. तिथे संघाचा भगवा ध्वज कायम आहे. त्यामुळे संघावर चहूबाजूने टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी संघ आणि तिरंगा यांच्यातील नाते सांगत जळगाव जिल्ह्यातील फैजपूरमध्ये (Faizpur) झालेल्या काँग्रेस (Congress) अधिवेशनाचा संदर्भ दिला आहे. हा व्हिडीओ नवी दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या ‘भविष्य का भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टीकोन’ या कार्यक्रमातील आहे.
या व्हिडीओमध्ये मोहन भागवत म्हणतात की मी तुम्हला एक खरी गोष्ट सांगतो, फैजपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. पंडित नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकावला जाणार होता. यावेळी ध्वजस्तंभ ८० फूट उंचीचा होता. पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवण्यासाठी दोरी ओढली. पण तो ध्वज ८० फूट वरपर्यंत गेला नाही. तो मध्येच लटकू लागला. इतक्या उंचावरून जाऊन दोरीचा गुंता सोडवण्याचं धाडस कोणातच नव्हतं. त्यावेळी तिथे जमलेल्या गर्दीतून एक तरुण पुढे आला. तो खांबावर चढला. त्यानं गुंता सोडवला आणि राष्ट्रध्वज ८० फूट उंचीवर जाऊन फडकला.
पंडित नेहरूंनी त्या तरुणाचं कौतुक केलं. त्याची पाठ थोपटली. सायंकाळच्या खुल्या अधिवेशनात बोलावून तुझं अभिनंदन करू, सत्कार करू, असं नेहरू त्या तरुणाला म्हणाले. त्यावेळी नेहरूंना काही नेत्यांनी येवून सांगितलं की त्याला बोलावू नका. तो शाखेत जातो. त्या तरुणाचं नाव किसनसिंग राजपूत. ते संघाचे स्वयंसेवक होते. जळगावातल्या फैजापूरमध्ये ते राहायचे. (आता वृध्दपकाळाने काही वर्षांपुर्वीच त्यांचे निधन झाले आहे.) डॉ. हेडगेवार यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा ते स्वत: जळगावला गेले. त्यांनी किसनसिंग राजपूत यांची भेट घेतली आणि त्यांना चांदीची लहानशा तांब्या त्यांना भेट म्हणून दिली, असं भागवत म्हणाले.
संघाचे पहिल्यापासून तिरंग्याशी नाते
तिरंगा जेंव्हा पहिल्यांदा फडकवला गेला तेंव्हापासून संघ त्याच्याशी जुळलेला आहे. काँग्रेसने पहिल्यांदा संपूर्ण स्वतंत्र्याचा प्रस्ताव पारित केला, तेंव्हा डॉ.हेगडेवार यांनी सर्व शाखांमध्ये एक सक्यूलर काढले की, तिरंग्यासोबत संचलन करावे आणि काँग्रेसचे अभिनंदन करणारे प्रस्ताव प्रत्येक शाखेत मंजूर करुन काँगे्रसला पाठवावे, असेही मोहन भागवत म्हणाले.
फैजपूर अधिवेशनात स्वांतत्र्याची मुहूर्तमेढ
येथे १९३६ मध्ये फैजपूरमध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. या अधिवेशनात महात्मा गांधीजी सुद्धा उपस्थित होते. जळगाव जिल्ह्याच्या गौरवशाली इतीहासात फैजपूर अधिवेशनाला प्रचंड महत्त्व आहे. याच अधिवेशनात स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे म्हटले जाते.