⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मोबाईल सट्ट्याची जळगावात चलती, पोलिसांचा कानाडोळा

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । ११ जून २०२१ । जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी दोघेही ॲक्शन मोडमध्ये आले. जळगाव शहरातील अवैध धंदे त्यांनी हद्दपार करण्यास सुरुवात केली. शहरातील सट्टा पेढी जवळपास हद्दपार झाल्या असल्या तरी मोबाईल सट्टा घेणार्‍यांची संख्या मात्र वाढली आहे. पोलीस प्रशासन व स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे.

जळगाव शहरात काही वर्षांपूर्वी प्रत्येक परिसरात शेड उभारून सट्टा पेढी सुरू करण्यात आल्या होत्या. अनेक परिसरातून नागरिकांची याबाबत ओरड होत होती परंतु त्यावर अजून मधून कारवाई देखील केली जात असे. अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी देखील अवैद्य धंद्याचा मुद्दा उचलला होता. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षकपदी चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कुमार चिंथा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यास सुरुवात केली. जळगाव शहरातील अवैध धंदे बर्‍यापैकी कमी झाले असले तरी ठराविक ठिकाणी ठरलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठराविक धंदे मात्र नियमितपणे सुरू आहेत.

जळगाव शहर उपविभागात अनेक ठिकाणी आजही अवैध दारू विक्री, अवैध वाहतूक, रेशनिंगचा काळाबाजार, लॉजिंग व्यवसायातील गौडबंगाल, वाळू वाहतूक, अवैध देहविक्री व्यवसाय, लाकडांची वाहतूक, अंमली पदार्थ विक्री आणि मोबाईल सट्टा हे प्रकार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत फारशी माहिती नसली तरी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र या व्यवसायातील सर्व खाचखळगे माहिती आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सट्टा खेळण्याचा नवा प्रकार फार प्रचलित झाला. मुख्य सट्टापेढी चालक किंवा बुकी यांनी प्रत्येक परिसरात अँड्रॉइड मोबाइल असलेले एजंट नेमले आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे चिठ्ठी दिली जात होती आता तसे न होता मोबाईलवर आकडे एजंटकडे दिले जातात. एजंट मार्फत ते बुकीकडे पाठविण्यात येतात. आकडा येण्याच्या पाच मिनिटे अगोदरपर्यंत पाठविण्यात आले सर्व आकडे ग्राह्य धरण्यात येतात. दिवसभरातील व्यवहाराचा हिशोब दुसऱ्या दिवशी बुकीपर्यंत पोहोचविला जातो. जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सट्टा पेढी सुरू असली तरी शहरात मात्र क्वचित ठिकाणी पेढीवर लपून छपून सट्टा घेतला जातो. मोबाईल सट्टा घेणारे प्रत्येक प्रभागात ठरले आहेत. गेल्यावर्षी उपविभागीय अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या मदतीने मोबाईल सट्टा खेळणाऱ्या एकावर कारवाई केली होती मात्र त्यानंतर शहरात पोलिसांनी मोबाईल सट्टा खेळणाऱ्यावर कारवाई केल्याचे कुठे दिसून येत नाही.