⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, बालक जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । मोबाईलवर गेम खेळत असतांना हातातील मोबाईल हँडसेटच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. ही धक्कादायक घटना शेलवड (ता. बोदवड) येथे घडली असून यात दहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. चेतन प्रफुल्ल पाटील असे बालकाचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील चेतन प्रफुल्ल पाटील (वय १०) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त शेलवड येथे मामाच्या घरी गेला होता. मंगळवारी मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामुळे चेतनच्या हाताला इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना काळात सुट्टीमुळे आणि ऑनलाईन शिक्षणाच्या नादात विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन अधिक जडले. दिवसभर मोबाईल गेमिंगचे प्रमाण देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहे. सदर दुर्घटनेमुळे मोबाईलच्या वापरातील धोका हा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळावा. चार्जिंगला लावलेला असतांना शक्यतो मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको.