जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत जळगावकरांना दिलासा देण्याऐवजी, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीच भर पडली आहे. शहरात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे जळगावकर सध्या अंधाराच्या गर्तेत सापडले असून, त्यांना तीव्र उकाड्यात अघोषित लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘न्हाई’ (NHAI) च्या अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेतली. “ठेकेदारांची मनमानी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, जनतेला वेठीस धरू नका,” अशा कडक शब्दांत आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरात सध्या विविध भागांमध्ये नवीन भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम करताना संबंधित ठेकेदारांकडून अत्यंत बेजबाबदारपणा सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. नवीन केबलची जोडणी वेळेवर पूर्ण न करताच, ठेकेदार जुन्या पथदिव्यांच्या (स्ट्रीट लाईट) केबल्स सरसकट कापून टाकत आहेत. परिणामी, नवीन जोडणी मिळेपर्यंत अनेक कॉलनी आणि मुख्य रस्ते रात्रीच्या वेळी पूर्णपणे काळोखात बुडत आहेत. विशेष म्हणजे, मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम केले जात असल्याने यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे.
महावितरणचा ‘तांत्रिक’ खेळ आणि नागरिकांचा संताप
जळगावकरांना उन्हाच्या तीव्र उकाड्यात आधीच मनस्ताप सहन करावा लागत असताना, त्यात महावितरणच्या अघोषित लोडशेडिंगची भर पडली आहे. रात्रीच्या वेळी वारंवार वीज गायब होत असून, नागरिकांनी विचारणा केल्यास महावितरणकडून केवळ ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते. स्ट्रीट लाईटचे फ्युज, वायरिंग आणि नियमित मेंटेनन्सकडे (दुरुस्ती) पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
आमदार भोळेंचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
पद्मालय विश्रामगृहात झालेल्या या आढावा बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली. “विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे जळगावच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने कामे केल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करा. नागरिकांना अखंडित वीज आणि रस्ते प्रकाशमान मिळणे हा त्यांचा हक्क आहे, त्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम आमदार भोळे यांनी दिला. आता या इशाऱ्यानंतर तरी जळगाव शहराचा अंधार दूर होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










