बुधवार, जून 7, 2023

आमदार चंद्रकांत पाटील यांनी पकडून दिला 21 लाखांचा गुटखा

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः गोपनीय माहितीवरून 21 लाखांचा गुटखा पकडून दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुज्ञ लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या धाडसानंतर पोलीस व अन्न औषध प्रशासनाला जाग येणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, 20 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून वाहन चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर शहराकडे येणारी गाडी (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.9287) या आशयर वाहनात गुटखा असल्याची गोपनीय माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रवर्तन चौकात जाऊन या गाडीला अडवत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली

पोलीस ठाण्याच्या आवारात वाहन आणल्यानंतर त्यातील गुटख्याची मोजणी केली असता तब्बल 20 लाख 70 हजारांचा विमल पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आली तर पाच लाखांचे आयशर वाहन मिळून 25 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कॉन्स्टेबल दिगंबर रतन कोळी (मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून भरत सुदाम बाविस्कर (37, दिनकर नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव), विकास सोनवणे (साठा मालक, पाळधी, ता.धरणगाव) व शहापूरचा गुटखा विक्री करणारा मालक अशा विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.