जळगाव लाईव्ह न्यूज। 30 सप्टेंबर २०२१। मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून गुलाब चक्रीवादळामुळे पावसाची संततधार सुरू होती, परिणामी तालुक्यातील खरिपाची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कपाशी पिकांचे बोंडे फुलण्याऐवजी रोपवरच सडत आहेत. अन्य पिकांचेही पावसामुळे अतोनात नुकसान होऊन ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. प्रसंगी नायब तहसीलदार निकेतन वाले, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, दिलीप पाटील, सुभाष पाटील, साहेबराव पाटील, समाधान पाटील, भागवत पाटील, देविदास पाटील, संजय पाटील, जगन्नाथ पाटील, वसंत पाटील, धोंडु पाटील, विनायक पाटील, गोपाळ पाटील, राजेंद्र पाटील, बंडु पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
नुकसान भरपाईची मागणी
मे महिन्यात उचंदे, मेंढोळदे, शेमळदे, पंचाणे, मेळसांगवे, पुरनाड परीसरात चक्रीवादळामुळे केळी उध्वस्त झाली होती. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या तडाख्यातुन शेतकरी सावरत नाही तोच अतिवृष्टीमुळे खरीपाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र विस्कळीत झाले असुन दयनिय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. तरी पिक विमा कंपनीने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, तसेच शासनानेही आर्थिक मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.