जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२६ । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या आमदारांवर केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करत मोठा दावा केला आहे. राऊत हेच भविष्यात ठाकरे गटात फुट पाडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी नुकतेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा-पारोळाचे आमदार यांच्याबाबत विधान केले होते. त्यांनी असा दावा केला होता की, पुढील विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. राऊत यांनी यावर पुष्टी देताना सांगितले होते की, हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत, त्यामुळे ही माहिती त्यांना खात्रीने मिळालेली आहे, असं संजय राऊत म्हणाले होते

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीला राऊत हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. “आमची निष्ठा कोणावर आहे, हे सांगण्याची गरज नाही. आम्ही शेवटपर्यंत शिंदे साहेबांसोबतच राहणार,” असे ठाम विधान त्यांनी केले.
शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळेच झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच मुख्य कारणीभूत असल्याचं आमदार पाटील म्हणाले. दरम्यान याचवेळी आमदार पाटील यांनी एक खळबळजनक दावा करत संजय राऊतच हे भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा केला आहे.
राऊत हे ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत आहेत. ते शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटात राऊत मोठा उठाव करणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे संजय राऊत यांचा भाजपाकडे जाण्याचा दावा आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे गट फुटण्याचा दावा, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







