जळगावात महायुती झाली तर ठीक, नाहीतर.. आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऑक्टोबर 12, 2025 3:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२५ । येत्या काही दिवसात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबतच चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र याच दरम्यान अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे,

ncp mla anil patil

नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती झाली तर ठीक, नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे, त्यामुळे युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवू, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकते दिले होते, त्यानंतर आता पाटील यांनी देखील मोठं विधान केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now