जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । धरणगाव येथील तिळवण तेली पंच मंडळी, सुभाष दरवाजा तेली मढीच्या जागेवर भव्य-अत्याधुनिक सर्व सुविधांनीयुक्त सभागृह बांधण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. संबधीत कामाची प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून तेली समाज मंडळाचे सभागृहाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी तेली समाजाचे पंच मंडळ आणि समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती.
धरणगाव नगरपरिषद हद्दीतील सिटीएस क्रमांक १४२ अ आणि सिटीएस क्रमांक १४२ ब जागेवर ( खालचा मजला व पहिला मजला) तेली समाज पंच मंडळासाठी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम प्रलंबित होते. ते करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत नुकतेच प्रशासकिय मान्यता आदेश प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जा.क्र. नप / नियोजन / नगरोत्थान योजना / १५/२०२४ दिनांक ३०/०९/२०२४ च्या पत्रानुसार नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रशासकिय मंजूरी दिली आहे. या कामासाठी २५ लाख ६० हजार ९९९ रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.
तिळवण तेली समाज मंडळाच्या पंच मंडळींनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ना. पाटील यांना प्रस्तावित बहुउद्देशीय सभागृहाची गरज पटवून दिली होती. संबधीत सभागृह हे दुमजली होणार असून तळमजल्यावर पंचमंडळीचे सभागृह आणि वरच्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, सभागृह अपेक्षित आहे. समाजाची गरज आणि निकड ओळखून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याने समाजात आनंद, उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. पंचमंडळीने यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.