जळगाव लाईव्ह न्यूज । गिरणा नदीच्या काठावर आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून परप्रांतीय तरूणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जयसींग सुभाष बारेला (वय ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील मूळचा शिरवेल येथील रहिवासी असलेला जयसिंग बारेला हा जळगाव तालुक्यातील लमांजन गावात कुटुंबासह मजुरीच्या निमित्ताने वास्तव्यास होता. मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी गिरणा नदीकाठी आंघोळीसाठी गेले होते. ठरलेल्या वेळेत ते परत न आल्याने त्यांची वृद्ध आई आणि घरी आलेल्या बहिणीला चिंता वाटू लागली. सायंकाळी त्यांनी नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसींग यांचे कपडे आणि त्यांचा मोबाईल फोन आढळून आला. यामुळे जयसींग नदीत बुडाल्याचा गंभीर संशय त्यांच्या कुटुंबीयांना आला.

आई व बहिणीने तातडीने ही माहिती लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना कळवली. पोलीस पाटलांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात आला, मात्र अंधारामुळे जयसींग बारेला यांचा शोध लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि गिरणा नदीच्या पात्रातून जयसींग यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








