दुहेरी संकटाने शेतकरी चिंताग्रस्त! हवामान खात्याच्या नव्या अंदाजाने वाढणार आणखी टेन्शन..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ । राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्‍यातील सर्वच शहरातील कमाल तापमान (Temperature) हे चाळीशी पार गेले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ होणार असल्याचा अंदाज पुण्यातील हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक भागाला पुन्हा अवकाळी पावसाचा अलर्ट जारी देखील करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी आणि वाढते तापमान या दुहेरी संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने अनेक भागांना झोडपून काढले होते. यामुळे तापमानाचा पारा 35 अंशापर्यंत होता. सध्या राज्यात अद्यापही काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, काही ढगाळ वातावरण असतांना देखील प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा 40 अंशावर चढला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अनेक भागात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे जळगावकर वाढत्या उष्णतेमुळे चांगलाच हैराण झाला आहे.

जिल्ह्यात भुसावळात १३ एप्रिलनंतर काल सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान पुन्हा 43.3 अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात ही नोंद झाली.

राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उष्मा आणि सायंकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या या कहराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाबरोबर तापमानात वाढ होण्याच्या इशाऱ्याने आधीच संकटात सापडलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.