जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आता अशातच पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्यात जळगावात देखील पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा alert असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.
यात जळगाव जिल्ह्याचा देखील इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. जळगावात काही दिवसापूर्वी तापमानाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. तापत्या उन्हामुळे जळगावकर हैराण झाले होते. मात्र पूर्वमोसमी पावसाच्या अंदाजाने उकाडा कमी होण्याची शक्यता आहे.
वर्षाला मान्सून मुंबईत 10 जूनपर्यंत दाखल होतो. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. दरम्यान मान्सूनच्या प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याने 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.