जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । आपण सुरक्षितपणे सुखाची दिवाळी साजरी करत असताना, देशाच्या रक्षणार्थ छातीवर गोळी झेलत बलिदान देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या परिवारासोबत रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या सदस्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, आर्या फाउंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील, रोटरीचे डीजीएन डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर व्यासपीठावर अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प सचिव तुषार तोतला, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प प्रमुख महेश कापुरे उपस्थित होते. या कार्यक्रमात शहीद सैनिक राजेंद्र ठाकरे, सुवालाल हनुवते, विलास पवार, भानुदास बेडीसकर, राकेश शिंदे, भैय्यासाहेब बागुल, वसंत उबाळे, कमलाकर पाटील, राजू साळवे, अरुण जाधव, देविदास पाटील, प्रदीप पाटील, अविनाश पाटील, अमोल साळुंखे, अनिल पवार, यश देशमुख, निलेश सोनवणे यांच्या वीर माता, वीर पत्नी व वीर पिता यांचा दिवाळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
त्यात फराळ, फटाके, आकाश कंदील, पणत्या, पितळी दिवे, लाइटिंग,सुगंधी उटणे, साबण, साडी, रांगोळ्या, तोरण, चटई, आसन, सप्तधान्य (डाळी),तेल, तांदूळ अशा २६ वस्तू असलेल्या प्रवासी बॅग दिवाळी भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आल्या. शहिदांच्या वीरमाता पत्नी यांनी मान्यवरांसह रोटरी वेस्टच्या पदाधिकाऱ्यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. लेफ्टनंट कर्नल आश्विन वैद्य यांनी सैनिकांना सरावा दरम्यानच राष्ट्र सर्व प्रथम हे शिकवले जाते. सैनिक कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय देशकार्य करू शकत नाही. त्यामुळे सैनिकांचे बलिदान व त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. जळगावकर नागरिक सकारात्मक असून, रोटरी वेस्टच्या या उपक्रमामुळे ते संवेदनशील असल्याचेही दिसून आले असे प्रतिपादन केले.
समाजाने जागृत होऊन शहीद सैनिकांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहावे यासाठी आर्या फाउंडेशन कार्य करीत आहे. काश्मीरमध्ये फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या कार्याची माहिती देऊन डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सैनिकांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही असे सांगितले. डीजीएन डॉ.राजेश पाटील यांनी रोटरीची माहिती देत मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तुषार तोतला यांनी तर सूत्रसंचालन महेश कापुरे यांनी केले. आभार नितीन रेदासनी यांनी मानले.