⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव : सासऱ्यांमुळे गेलं सुनेचं सरपंचपद, इतर सदस्यही अपात्र ; नेमकी कोणती चूक नडली?

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२३ । कोणतीही निवडणूक जिंकणे सोपे नाही. ग्रामपंचायतीवर निवडून जाणं एकवेळेला सोप्पं असलं तरी पण पाच वर्षे आपल्या हातून एकही चुक् होणार नाही हे जास्त अवघड असतं. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंचसह एका सदस्याला सासऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा फटका बसला आहे.

म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती संदानशिव व ग्रामपंचायत सदस्य उषा सैंदाणे यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे.

म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती सतीश संदानशिव यांचे सासरे भागवत उदा संदानशिव यांनी शासकीय जमिनीवर १९८ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. तर ग्राम पंचायत सदस्य उषा दीपक सैंदाणे यांचे सासरे मगन खंडू सैंदाणे यांनी १६१ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी माधुरी खंडू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींवर सुनावणी सुरू ठेवली होती.

ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी प्रत्यक्ष अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाल्याने त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती संदानशिव यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून तर उषा सैंदाणे यांना सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.