जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । पाडळसरे येथून जवळच असलेल्या निम येथील कपिलेश्वर मंदिर रस्त्यावरील, हेमंत कैलास चौधरी यांच्या शेतातील बाजरीचे पीक महिन्यापूर्वी अज्ञात माथेफिरूने कापून फेकले होते. तर २४ रोजी त्याच शेतातील बाजरी व मक्कीची १७०० पेंडींची चाऱ्याची कुट्टी अज्ञाताने पेटवून दिली. दरम्यान, पशुधनाचा चारा जळाल्याचे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
या आगीत शेतीची अवजारे, ठिबकच्या नळ्या व पीव्हीसी पाइप जळाल्याने सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन पावसाळ्यापूर्वी बाजरी व मक्याची कुट्टी जाळून टाकल्याने पशुधनाचा चारा हिरावल्याने, पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याबाबत मारवड पोलिस ठाण्यात हेमंत चौधरी यांनी तक्रार दिल्याने, अकस्मात आगीची नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी तलाठी जितेंद्र जोगी व हवालदार मुकेश साळुंखे यांनी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली. माथेफिरुच्या उपद्रवामुळे नीम गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज