विवाहितेला दूधात झोपेच्या गोळ्या द्यायचा अन्.. जळगावला हादरवून सोडणारी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२३ । राज्यासह जळगावात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नसून अशातच जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दूधात गोळ्या देवून विवाहितेवर झोपेतच अत्याचार केल्याची घटना शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडली. वारंवार घडणाऱ्या प्रकारातून जाणीव झाल्याने विवाहितेने त्या गोष्टीस नकार दिला. त्यानंतर तिला मुलगा व पतीचा खून करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एका जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरात भाड्याचे घर घेण्यासाठी विवाहितेला जयदीप पाटील याने मदत केली होती. तेव्हापासून मैत्री झाल्याने त्याचे त्या विवाहितेच्या घरी ये-जा वाढली. पीडितेच्या पतीची बदली झाल्याने ते नोकरीच्या ठिकाणी गेले.

एकदा पीडिता आजारी पडली. तेव्हा जयदीप पाटील याने गरम दूधात झोपेच्या गोळ्या मिसळून पीडितेवर अत्याचार केला. घडला प्रकार कुणालाही सांगू नये, म्हणून तो ब्लॅकमेल करीत होता. ४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ दरम्यान त्याने विवाहितेवर अत्याचार केला. विवाहितेने नकार दिल्यावर जयदीप याने मुलगा व पतीचा खून करण्याची धमकी दिली.

दरम्यान, अत्याचार केल्याने पीडिता सावध होऊन त्याच्यापासून लांब राहू लागली. त्यामुळे जयदीप पाटील याने तिच्या पतीलाच फोन करून आमचे संबंध होते. आता ती दुसऱ्यासोबत जुळली आहे, असे खोटे सांगितले. त्यावरून पीडितेच्या पतीने पोलिस चौकशी केल्यावर घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला. याबाबत विवाहितेने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात जयदीप पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.