Jalgaon : चारित्र्याचा संशय घेतल्याने विवाहितेची तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । चारित्र्याचा संशय घेतल्याने पती नणंदेच्या जाचाला कंटाळून शिरूडच्या विवाहितेने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सुकवद ता. शिंदखेडा येथे घडली. याप्रकरणी उशिराने मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा आनंदराव वाघ (वय ४२) या महिलेचा पती सतत दारू पित असल्याने ती आपल्या माहेरी शिरूड ता. अमळनेर येथे राहत आहे. तिची मुलगी सुज्ञानी राहुल ढिवरे वय २४ वर्षे हीचा विवाह ५ मे २०२४ रोजी शिरपूर तालुक्यातील सावेर येथील राहुल जगन ढिक्रे याच्याशी झाला होता. जावई राहुल काहीच काम करीत नव्हता. म्हणून तिची मुलगी सुज्ञानी ही अमळनेर येथे एमएसईबीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत होती. ती रोज एसटी ने शिरपूरहुन ये जा करीत होती. राहुलची बहीण आणि राहुल हे तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते.
तू कुठे आहेस? व्हिडीओ कॉल कर, तुझ्या शेजारी कोण आहे ते दाखव असे सांगून मानसिक त्रास देत होते. २ नोव्हेंबर रोजी सुज्ञानी भाऊबीजेसाठी येणार होती मात्र तीचा फोन बंद येत होता. नंदलाल याने ४ रोजी अमळनेर ला हरवल्याची तक्रार दाखल केली होती. १७ नोव्हेंबरला एका तरुणीचा मृतदेह तापीत सापडल्याचे कळाल्याने ते शिंदखेडा पोलिस स्टेशनला गेले असता १६ रोजी अंत्यसंस्कार झाले होते. कपड्यावरून ती सुज्ञानी असल्याची खात्री झाली. मुलीच्या आईने तक्रार दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला मृताचा पती राहुल व नणंद छाया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.