जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ आणि जळगावमार्गे रेल्वेने पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर विसापूर-रांजणगाव-सारोळा स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेतला जाणार आहे. परिणामी, उद्यापासून २६ ते ३० मे दरम्यान या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.

यादरम्यान सहा गाड्या रद्द, १५ गाड्या पर्यायी मार्गाने चालवल्या जातील. चार रेल्वेगाड्या २ ते ८ तास उशिराने सुटणार आहेत. जळगावमार्गे धावणारी झेलम एक्स्प्रेस कल्याण लोणावळा मार्गे पुण्याला जाईल. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेने हा ब्लॉक घेतल्यामुळे गावी जाणाऱ्या आणि पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होणार असून त्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडणार आहे.

या गाड्या झाल्या रद्द?
अमरावती ते पुणे एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११०२६) २७ आणि २९ मे रोजी, तर पुणे ते अमरावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११०२५) २८ आणि ३० मे रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी ते हडपसर विशेष गाडी (०१९२२) २७ मे रोजी आणि तिची परतीची हडपसर ते झाँसी विशेष गाडी (०१९२१) २८ मे रोजी धावणार नाही. याशिवाय नागपूर ते पुणे विशेष गाडी (०१४५८) २८ मे रोजी आणि पुणे ते नागपूर विशेष गाडी (०१४५७) २७ मे रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
महत्वाच्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या गाड्या नेहमीच्या दौंड-मनमाड मार्गाऐवजी इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. हावडा-पुणे एक्सप्रेस (१२१३०) २६ व २८ मे रोजी हावडा येथून सुटल्यानंतर मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत आणि लोणावळा मार्गे पुणे येथे पोहोचेल. अमरावती-पुणे एक्सप्रेस (११०२६) २७ व २८ मे रोजी अकोला, पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी आणि दौंड मार्गे धावेल, तर पुणे-अमरावती एक्सप्रेस (११०२५) २८ व २९ मे रोजी याच बदललेल्या मार्गाने परतेल. हडपसर-बनारस एक्सप्रेस (२२५९०) २८ व ३० मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड मार्गे बनारसला जाईल. प्रसिद्ध केएसआर बंगळूर-नई दिल्ली एक्सप्रेस (१२६२७) २७ व २९ मे रोजी सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, छत्रपती संभाजी नगर आणि मनमाड मार्गे पुढे जाईल. यशवंतपूर-चंदीगड एक्सप्रेस (२२६८५) २७ मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड मार्गे धावणार आहे.
तसेच जम्मूतावी-पुणे एक्सप्रेस (११०७८) २६ व २८ मे रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत आणि लोणावळा मार्गे पुणे येथे जाईल. निजामाबाद-पुणे एक्सप्रेस (११४१०) २७ ते २९ मे या काळात परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी आणि दौंड मार्गे चालेल, तर तिची परतीची दौंड-निजामाबाद एक्सप्रेस (११४०९) २८ ते ३० मे दरम्यान पुणे येथून सुटून दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड आणि परभणी मार्गे जाईल.
हडपसर-नांदेड एक्सप्रेस (१७६२९) २८ व २९ मे रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड आणि परभणी मार्गे धावेल, तर परतीची नांदेड-हडपसर एक्सप्रेस (१७६३०) २८ व २९ मे रोजी याच मार्गाने हडपसरला पोहोचेल. पुणे-नागपूर एक्सप्रेस (२२१४१) २८ मे रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड मार्गे जाईल. हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२०६५७) २९ मे रोजी सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, छत्रपती संभाजी नगर आणि मनमाड मार्गे धावणार आहे. पुणे-गोरखपूर एक्सप्रेस (१५०३०) ३० मे रोजी लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी आणि मनमाड मार्गे जाईल, तर हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा एक्सप्रेस (१२७८०) २९ मे रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा आणि पुणे मार्गे वास्को दि गामाला पोहोचेल.
काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
या मार्गावरील काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल (पुनर्निर्धारण) करण्यात आला आहे. २८ मे रोजी सुटणारी हडपसर-रेवा एक्सप्रेस (२०१५१) आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशिराने सुटेल. पुणे-गोरखपूर विशेष गाडी (०१४१५) २८ आणि ३० मे रोजी तब्बल ८ तास उशिराने धावणार आहे. याशिवाय ३० मे रोजी सुटणारी पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस (१२२२१) आणि पुणे-दानापूर विशेष गाडी (०१४४९) या दोन्ही गाड्या पुण्यातून आपापल्या नियोजित वेळेपेक्षा ३ तास उशिराने सुटणार आहेत.








