जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । सध्या पूर्वमोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरणामुळे तापमान ४० अंशांवर आहे. तापमानात घट झाल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आर्द्रता २६ टक्क्यावर गेल्याने उकाडा जाणवत आहे. दरम्यान, उद्या २७ मे पासून जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जळगावचा पारा ४५ अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पावसाचे संकेत आणि ढगांनी गर्दी केल्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे.
२४ मे राेजी जिल्ह्यात प्रथमच तापमान ३९.५ एवढ्या खाली आला होता. २५ मे राेजीदेखील तापमान ४० अंशांवर हाेते. तापमानात घट झाल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी ३० किमीवरून १५ किमीपर्यंत कमी झालेला हाेता. तसेच आर्द्रता २६ टक्क्यावर असल्याने दिवसभर उकाडा जाणवत हाेता.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, काेकणासह उत्तर महाराष्ट्रात पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळतील. जळगाव जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आणखी उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.