जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र मान्सून (Mansoon) दाखल झाला आहे, परंतु, काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वत्र त्याने दडी मारली आहे. मान्सून १३ जून रोजी खान्देशात दाखल झाला होता. मात्र, मान्सूनने सुरुवातीलाच जळगावकडे (Jalgaon) पाठ फिरवली आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात तापमानही ३९.८ अंशांपर्यंत गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चांगल्या पावसासाठी जळगावकरांना आणखी तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मान्सून यंदा राज्यात लवकर दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज यंदा चुकीचा ठरला आहे. महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल झाला. त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र राज्यात मान्सून दाखल होऊनही काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वत्र त्याने दडी मारली आहे.
निम्मा जून महिना संपत आला तरी मान्सूनने कुठेही जोरदार हजेरी लावली नाहीय. गुजरातमार्गे खान्देशात दाखल झालेला मान्सूनने सुरुवातीलाच जळगावकडे पाठ फिरवली आहे. पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली. परंतु मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मान्सूननं दांडी मारली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने उकाडा पुन्हा वाढला आहे. चांगल्या पावसासाठी जळगावकरांना आणखी तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्या चा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात
दरम्यान, दोन दिवसांनंतर दडी मारलेल्या पावसाने पुन्हा आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाला जोरात सुरूवात केली आहे. रविवारनंतर राज्यात पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता पाऊस पुन्हा सक्रीय होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली.