गुन्हेजळगाव शहर

क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या, आरोपाला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । क्षुल्लक कारणावरून हत्या करणाऱ्या आणि दुसऱ्यावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपी नीलेश ऊर्फ बाळा प्रवीण पवार (वय २७, रा. कुसुंबे, ता. रावेर, ह. मु. रिंगरोड, जळगाव) याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

शिव कॉलनी स्टॉपसमोरील देशी दारूच्या दुकानासमोर २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी आरोपी नीलेश पवार, अमरसिंग चव्हाण व गणेश चव्हाण यांच्यात मोबाइल खराब केल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मृत अक्षय अजय चव्हाण (वय २३, रा. मढी चौक, पिंप्राळा) आणि त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव तेथे गेले होते.

भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना नीलेश याने अक्षय चव्हाण याच्या छातीवर व पोटावर धारदार चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच युवराज जाधव याच्याही पाठीवर वार करून तेथून पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी अक्षय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृताचा भाऊ शैलेश अजय चव्हाण याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नीलेश पवार याला हत्या प्रकरणांत जन्मठेप व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button