जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील लोक समजूतदारपणे स्वतःहून मशिदीवरील भोंगे काढण्यास तयार असताना महाविकास आघाडी सरकार मात्र त्यांना भोंग्यांसाठी परवानग्या घेण्याचा आग्रह करत आहे. अशा प्रकारे वर्षभरासाठी कायमची परवानगी देता येत नाही तरीही पोलीस आग्रह धरत आहेत. आघाडी सरकारच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे व मुस्लिमांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रास्त मुद्दे मांडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी त्यांची मागणी आहे. मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजविण्याच्या त्यांच्या इशाऱ्याला सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमुळे दोन समुदायांना वेगळा न्याय लावला जात आहे हे स्पष्ट होते.
हनुमान चालिसा म्हटले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल होणे हा काय प्रकार आहे, असा सवाल करून मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, बाबरी मशिद – राम जन्मभूमीच्या आंदोलनात हजारोंनी बलिदान केले, लाखो लोकांनी सत्याग्रह केला पण हिंदू समाज थांबला नाही. सरकारने याचा विसर पडू देऊ नये.