जळगाव गारठले ! यंदाच्या हंगामातील नीचांकी किमान तापमानाची झाली नोंद..
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानाचा पारा आणखीच घसरला असून यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद हवामान विभागाकडे झाली. तर पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यातील थंडी गायब होऊन उकाडा वाढला होता. मात्र आता चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने जळगावातील किमान तापमानही वेगाने घसरले आहे.
गुरुवारी किमान तापमान १० अंशांवर होते, यात घट होऊन शुक्रवारी किमान तापमान ८.९ अंशांवर पोहोचले होते; परंतु शनिवारी पुन्हा किमान तापमानात घसरण झाली आहे. या दिवशी किमान तापमान ८.४ अंशांवर गेल्याची नोंद झाली. दरम्यान जिल्ह्यात १८ पर्यंत थंडीची लाट असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.