जळगाव लाईव्ह न्यूज । स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता असताना महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठा पक्षाचे नगरसेवक शरद शामराव तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीने (मविआ) मात्र आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सुटली असून, पक्षाचे जळगाव महानगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शरद शामराव तायडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद तायडे यांनी थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता महाविकास आघाडीच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी महायुती कोणाला मैदानात उतरवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







