⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रामायण महाकाव्य रचणार्‍या महर्षी वाल्मीकी ऋषींचा जन्म जळगाव जिल्ह्यात झालाय, हे तुम्हाला माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रभुश्रीरामांची गाथा सांगणार्‍या रामायणाचे रचनाकार म्हणून महर्षी वाल्मिकी यांना पुजले जाते. त्रेतायुगात महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. रामायण हे एक महाकाव्य आहे. हजारो वर्षे लोटली, तरी यातील तत्त्वांचा प्रभाव आजही कायम आहे. महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेले रामायणावरूनच गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस रचल्याचे सांगितले जाते. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.

महर्षी वाल्मीकींविषयी काही मान्यता

महर्षी वाल्मकींविषयी अनेक मान्यता समाजात रुढ झाल्या आहेत. एका मान्यतेनुसार, वाल्मीकी आधी लूटमार करायचे त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली. बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकी’ असे नाव मिळाले, असे म्हटले जाते. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे.

महाभारतात महर्षी वाल्मीकींचा उल्लेख

महर्षी वाल्मीकींच्या आश्रमाचा उल्लेख अनेक ग्रंथ तथा पौराणिक कथांमध्ये होतो. मात्र त्यांचा जन्म कुठे झाला याचा फारसा उल्लेख येत नाही. आदिकवी महर्षी वाल्मीकी यांचा जन्म अश्‍विन पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. एका पौराणिक कथेनुसार, रामायणात तमासा तीरावर वाल्मीकींच्या आश्रमाचे वर्णन केले जाते. (जे सध्याच्या कानपूर शहराजवळ येते) वाल्मीकींचे अनेक शिष्य होत. यामध्ये भरद्वाज हा प्रमुख शिष्य होता. प्रभु श्रीरांनी सीतामातेचा त्याग केल्यावर सीतामातेसह त्यांचे पुत्र लव व कुश यांचा वाल्मिकी ऋषींनी सांभाळ केला. कुश लव यांना शिक्षण देऊन रामायण शिकवले रामाच्या अश्‍वमेध यज्ञात शिष्य समवेत उपस्थित होते असा उल्लेख महाभारतात केला आहे.

वालझरी हे महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) यात याचा उल्लेख आहे. तसे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफीटेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पृष्ठ क्रमांक ६४ वर उल्लेख केल्यानुसार, ‘रामायण’ या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच कि.मी. अंतरावर चाळीसगाव-पाटस रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे. तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे. या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते. वाल्मीकीचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे. यात जुनी शिवपिंड आहे. या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे. राम-लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ, वाल्मीकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे, जो महाकवी वाल्मीकींच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे.

अशी झाली रामायणाची निर्मिती

रामायण निर्मितीची महत्त्वाची कथा क्रौंचवधाची होय. एकदा तमसा नदीच्या तीरावर असलेल्या क्रौंच पक्षाच्या एका जोडीतील नराला एक व्याध बाणाने मारीत असल्याचे वाल्मीकिंने पाहिले. क्रौंचीच्या करूण विलापाने त्याचे हृदय हेलावले व त्याच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुभातील या अकल्पित काव्यरचनेने वाल्मीकि स्वतःच भारावले. पुढे ब्रह्मदेव त्याच्यांकडे आले व आशीर्वाद देऊन महर्षी वाल्मीकिंना रामायण रचण्याची आज्ञा केली. त्याच्या काव्यस्फूर्तीची ही रचना इतर ग्रंथामध्येही निर्देशिली आहे. परंतु ही कथा कवी आणि काव्य यांच्या गौरवातूनच प्रसृत झाली असावी, अशी मान्यता आहे. भगवान ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामायणात २४००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत. रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे. महर्षी वाल्मीकींचे जन्मस्थान हे जळगाव जिल्ह्यात असणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी भाग्याचीच बाब आहे.