महर्षी वाल्मिक जयंती : विमानतळाच्या नामकरणासाठी प्रयत्नशील – महापौर
Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । जळगाव विमानतळाचे नामकरण करण्याबाबत जळगाव शहर महानगरपालिकेत ठराव यापूर्वीच झाला आहे, मात्र त्याचे नामकरण झालेले नाही. यादृष्टीने लवकरात लवकर विमानतळाच्या नामकरणाबाबत आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावादेखील केला जात असल्याचे प्रतिपादन महापौर महाजन यांनी केले.
महर्षी वाल्मिक यांची जयंती आज रविवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानुषंगाने शहरातील महर्षी वाल्मिक नगर येथे महर्षी वाल्मिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन या अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या. तसेच स्वातंत्र्यचौक परिसरात महर्षि वाल्मिक यांचा पुतळा बसविण्याबाबत आपणाकडून सुचविण्यात आले आहे. याबाबत जळगाव शहर महानगरपालिकेत जरुर विषय घेऊन प्रस्ताव मांडला जाईल. तसेच त्याची पूर्तता शासनाकडेदेखील केली जाईल. असे सांगून उपस्थित सर्वांना महर्षी वाल्मिक जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांचे अनमोल विचार जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छतामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, शांताराम सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.आश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, नगरसेवक किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, भरत सपकाळे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.