सोमवार, डिसेंबर 11, 2023

..तेव्हाच फुटलो असतो! गुलाबराव पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाळीला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. हा दिवस काल ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा केला. याच दरम्यान, शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर तोफ डागत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गद्दार आणि खोके याशिवाय यांच्याकडे दुसरा मुद्दाच नसून जर गद्दारी करायची असती तर नारायण राणे आणि राज ठाकरे गेले तेव्हाच फुटलो असतो, तेव्हा आमदार होते आणि ऑफर देखील होत्या, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.या संजय राऊतांना म्हणावं किमान या महापालिका निवडणुकीत उभे राहून नगरसेवक होऊन दाखवा, तेवढीही त्यांची लायकी नाही, अशी टीका त्यांनी केली. आमच्यावर टीका करणारे संजय राऊत कोणी लोकनेता नाही तर आमच्यासारख्या लोकनेत्यांच्या तुकड्यावर मोठा झालेला माणूस आहे. एकदा दोनदा नाही तर चार वेळेला, पहिल्यावेळी कोणताही पिक्चर चालून जाता राऊताचा कोणता पिक्चर आला आहे, सध्या ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकत नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला.

आता आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे आम्ही गद्दारी केली असती तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत गेलो असतो पण आम्ही शिवसेना सोडली नाही, उलट आम्हालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याचेही गुलाबराव यांनी सांगितले. आता भाषणात कोणीतरी खोके बोलले, कोणी ज्यांनी काँग्रेसशी हात मिळवून विखे पाटील यांचे पॅनल पडले. म्हणजे तुमचे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी आय लव्ह यू आणि गद्दार आम्ही का असा सवाल गुलाबराव पाटील केला.