जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला आहे. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार असून हवामान खात्याने राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे.आज कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार

जळगावात दमदार पावसाची प्रतीक्षा
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात १ ते ३ जुलै दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रात अचानक झालेला बदल व वाऱ्यांच्या दिशेतील तात्पुरता अडथळ्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना जळगावसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पाडण्यास विलंब होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार होण्यास वेळ लागत असल्याने मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. बुधवारी जळगावात १५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. आज आणि उद्या (३ व ४ जुलै) दमदार पावसाची शक्यता आहे.











