जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता; तसेच खरी शिवसेना कोणाची यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे कारणही आता समोर आलंय.

सुप्रीम कोर्टात सुनावणी तीन जणांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, सी. टी रविकुमार, हिमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते आहे. यापैकी सी टी रविकुमार आज उपलब्ध नसल्याची नोटीस आली आहे. सी टी रविकुमार गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली असल्याचं सांगितलं जातंय. तीन जणांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.

सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे. या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) कोणाची आणि शिंदे गटातील १६ (Eknath Shinde camp) आमदार अपात्र ठरणार का, याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.












