जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. मागील गेली काही दिवसापासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण ५ न्यायधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलंय. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात एकूण पाचहून अधिक याचिका दाखल झाल्या आहेत. शिंदे गटाने सर्वात आधी या प्रकरणावर याचिका दाखल केली होती. शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. या प्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. यावेळी कोर्टाने हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगून हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता हे प्रकरण घटनापीठाकडे गेले आहे.

याप्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडे जे प्रलंबित मुद्दे आहेत,त्यावर गुरुवारची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. याआधीही न्यायालयाच्या निरीक्षणाआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत कुठलाही मोठा निर्णय घेऊ नये, हे न्यायमूर्ती रमणा यांनी सांगितलं होतं. घटनापीठ कसं स्थापन होईल, कधी स्थापन होईल याबाबत काहीही निर्णय नाही, त्यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.












