मान्सूनबाबत हवामान खात्याचा नवा अंदाज! महाराष्ट्रात पाऊस लांबणार, वाचा नव्या तारखा?

मे 28, 2026 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२६ । महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या उन्हाचा कडाका आणि उकाड्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशातच, सर्वजण मोठ्या आशेने मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या आगमनाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी अपडेट जारी केली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ms update

साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. यंदा तो २६ मे रोजीच लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, गेल्या संपूर्ण आठवड्यापासून मान्सून श्रीलंकेच्या आसपासच्या परिसरातच रेंगाळला असून तिथून पुढे सरकलेला नाही. आयएमडीच्या ताज्या माहितीनुसार, आता केरळमध्ये मान्सूनचे अधिकृत आगमन २८ मे ते ३ जून दरम्यान कधीही होऊ शकते. २८ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला हवामानाचा नकाशा पाहिला, तर मान्सूनची प्रगती पूर्णपणे सुस्तावलेली दिसत आहे.

image 1

दिलासादायक बाब एवढीच आहे की, मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीपचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात आधीच प्रवेश केला असून, तो हळूहळू पुढे सरकत आहे., अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कधी दाखल होणार मान्सून?

केरळमध्ये मान्सूनचा प्रवास रेंगाळल्यामुळे महाराष्ट्रातील त्याच्या एन्ट्रीवर थेट परिणाम झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रात आणि मुंबईत यंदा मान्सून १० ते १५ जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात मान्सून १६ ते २१ जूनदरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतीकामांवर आणि खरीप हंगामावर सावट

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल या आशेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांची पूर्वतयारी आणि शेती मशागतीची कामे वेगाने सुरू केली होती. मात्र, मान्सूनच्या या संथ गतीमुळे शेतीची गणिते कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. ऐन उकाड्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसह बळीराजाचे डोळे आता चातकासारखे आभाळाकडे लागले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories