⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

महाराष्ट्रात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कशी असले पावसाची स्थिती? हवामान खात्याकडून अंदाज जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर जुलै महिन्यात मान्सून कसा असेल असा प्रश्न पडत होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सून पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान,पावसाळ्याचे पहिले दोन महिने संपल्यात जमा आहेत. आता उर्वरित ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 100 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मान्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.

ऑगस्ट महिना उजाडला म्हणजे आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्याची सुरवात निराशाजनक राहिली असली तरी जुलैमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात असेच चित्र राहिले तर खरिपाचे नुकसान अटळ होते. पण आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदाज जर खरा उतरला तर खरिपाची अपेक्षा कायम राहणार आहे.

मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यातील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ वगळता बहुतांशी भागात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.