जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । अवकाळी पावसानंतर जळगावसह राज्यात सूर्य आग ओकू लागला असून तापमानाचा पारा चाळीशी वर गेल्याने उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहे. यातच हवामान खात्याने महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या भागात उष्णतेची लाट?
बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट असून ठिकठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. आगामी तीन दिवस ही लाट राहील. त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू घसरण होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात आगामी ३ दिवस हवामान कोरडे राहील, तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावात आज म्हणजेच ८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट असेल.
दरम्यान सोमवारी अकोल्याचे तापमान राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर रविवारी ४०.५ अंशांवर असलेला जळगावचा पारा सोमवारी पारा ४२.५ अंशांवर पोहोचला. सोमवारी सकाळी ८ वाजेपासूनच चटका बसण्यास सुरुवात झाली होती. दुपारी १ वाजेपर्यंत पारा ३५ अंशांवर होता. यानंतर पुढील तीन तासांत तापमानात झपाट्याने वाढ होऊन या वर्षाचा उच्चांकी आकडा गाठला गेला. दिवसभर प्रचंड उष्णता जाणवत होती.