जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२१ । बीएचआर प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. आठवडाभरात एकनाथराव खडसेंच्या मागे ईडी लागली आणि खडसे समर्थक मैदानात उतरले. खडसे समर्थकांकडून जोरदार सोशल मिडिया कॅम्पेन केले जात असून ‘मी नाथाभाऊ समर्थक’चे वॉलपेपर व्हायरल केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामागे ईडीची चौकशी लागली आहे. खडसेंची जावई गिरीश चौधरी यांना ताब्यात घेतल्यानंतर खडसे गुरुवारी चौकशीसाठी हजर झाले होते तर खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करते वेळी खडसेंनी ‘तुम्ही ईडी लावा, मी सीडी लावतो’ असे वक्तव्य केले होते.
काही दिवसांपूर्वी खडसे व स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार असल्याचे प्रकरण उघड केले जात होते. त्यातच बीएचआर प्रकरणी शोध पथकाने अचानक अनेकांची धरपकड केली त्यातही गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय यांचा समावेश होता. एकंदरीत या सर्व घडामोडीपासून गिरीश महाजन हे लांब असले तरी त्यांच्या जवळील काही लोक ‘कुछ तो बडा होने वाला है..’ हा संदेश सोशल मीडिया पसरवत होते. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या या पोस्टनंतर खडसे कुटुंबाच्या मागे ईडी चौकशी लागली. त्यामुळे त्या पोस्टचा अन्वयार्थ तोच असल्याचा अंदाज आता लावण्यात येत आहे.
दरम्यान, ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही खडसेंची पाठराखण केली आहे. दरम्यान, खडसे गटाकडून ‘मी नाथाभाऊ समर्थक’ अशा आशयाचे वॉलपेपर सोशल मीडियात व्हायरल केले जात असून काही झाले तरी आम्ही खडसेंसोबत असल्याचे समर्थक दाखवून देत आहे.