⁠ 
शनिवार, मे 4, 2024

वडिलांचे छत्र हरपले, परिस्थितीशी झुंज देत जळगावची माधुरी झाली ‘PSI’

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। ही आहे जळगावच्या माधुरीच्या यशाची गाथा! मनातला कोलाहल कामात उतरवणं खूप कठीण असतं. त्यासाठी खूप संवेदनशील मन असावं लागतं. विशेष म्हणजे तितकी जिद्द आणि चिकाटी असावी लागते. प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीतून सकारात्मक मार्ग शोधण्याची जिज्ञासा असावी लागते. काहीही झालं तरी मी हे मिळवून दाखवणार किंवा मी हे करुन दाखवणारच असा ठाम आत्मविश्वास असावा लागतो. यादरम्यान अनेकदा ठेच खावी लागते. खडतर प्रवास करावा लागतो. तेव्हा कुठे आपल्या पदरात यश मिळतं.

हे यश खूप कठीण असतं. ते अनेकदा अगदी आपल्याजवळ येतंय असं भासवतं आणि नंतर हुलकावणी देतं. आपण पुन्हा प्रयत्न करतो आणि ते पुन्हा हाती येता-येता निसटतं. पण मनात जिद्द असली तर अथांग अशा संकटाच्या समुद्राला पार करुन आपण यशाच्या पैलतिरावर नक्कीच जाऊन पोहोचतो.यश इतकं कठीण असतं. म्हणूनच प्रत्येकाला यश हवं असतं. हे यश आपल्या आयुष्यात भरपूर आनंद आणि जबाबदाऱ्या घेऊन येतं. ते आलं की आपल्यासोबत अनेकांना त्याच्या प्रवाहातून न्हावून काढत असतं. ते आपल्यासह आपल्या कुटुंबाला, समाजाला नव्या आशांच्या, नव्या कामांच्या, नव्या विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलित करत असतं. म्हणून हे यश खूप खास असतं.

जळगावात अशाच सर्व परिस्थितीचा सामना करत एका तरुणीने खूप मोठं यश संपादीत केलं आहे. तिने या यशासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे तिने वर्षभरापूर्वी मोठ्या संकटाचा सामना केला. पण तरीही तिने हार मानली नाही. अखेर तिच्या मेहनतीपुढे आज नियतीने देखील गुडघे टेकले आहेत. तिला मोठं यश मिळालं आहे.

विशेष म्हणजे आम्ही आज अशाच एका जिद्दी तरुणीची संघर्षकथा सांगणार आहोत जिने अडचणींच्या परिस्थितीत स्वत:ला झोकून दिलं, जिने आपला आक्रोश कामातून दाखवून दिला. आपले पिता सोडून गेले याचा त्रास तिला खूप सतावतोय. पण तिने त्या दु:खातून स्वत:ला सावरतं पित्याचं स्वप्न साकार केलं. म्हणून या तरुणीचं आज पंचक्रोशीत कौतुक होतंय. या तरुणीचे अफाट प्रयत्न तिला तिच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेले आहेत. म्हणून तिचं आज सर्वत्र कौतुक होत आहे.

आम्ही ज्या तरुणीच्या यशाची कहाणी सांगत आहोत ही तरुणी मूळची जळगावच्या अमळनेर तालुक्यातील वासरे गावाची आहे. माधुरी मधुकर पाटील असं या शेतकरी कन्येचं नाव आहे. माधुरीला एमपीएससीच्या परीक्षेत मोठं यश मिळालं आहे. तिने पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारली आहे. तिच्यासाठी हे यश सोपं नव्हतं. विशेष म्हणजे तिच्यावर काही दिवसांपूर्वी मोठं संकट कोसळलं होतं. तिच्या वडिलांचं अपघाती निधन झालं. पण मुलगी फौजदार व्हावी, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. आपल्या वडिलांची हीच इच्छा आज माधुरीने पूर्ण करुन दाखवली. माधुरी फौजदार झाली.

माधुरी पाटील हिच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर तिने पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण हे वासरे गावातच केलं. तर पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण तिने कळमसरे येथून पूर्ण केलं. तिने अकरावी आणि बारावीचं शिक्षण अमळनेरच्या प्रसिद्ध अशा प्रताप महाविद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर तिने नगाव येथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

माधुरीने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असलं तरी माझी मुलगी पोलीस व्हावी, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यांनी तिला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर माधुरीने खूप अभ्यास केला. वसई येथील पोलीस हवालदार नितीन पाटील हे तिचे मेहुणे आहेत. त्यांनी माधुरीला मार्गदर्शन दिलं.

माधुरीच्या वडिलांचं गेल्यावर्षी मध्यप्रदेशमध्ये अपघाती निधन झालं. त्यामुळे तिच्या एकट्या भावावर शेतीच्या कामाचा भार पडला. विशेष म्हणजे माधुरीने वेळप्रसंगी भावाला शेतीच्या कामातही मदत केली. त्यानंतर ती वसईला गेली. तिने तिथे वाचनालयात अभ्यास केला. नंतर तिने 2020मध्ये पीएसआयची परीक्षा दिला. या परीक्षेचा निकाल आता दोन दिवसांपूर्वी लागला. या निकालात माधुरी उत्तीर्ण झाल्याची बातमी समोर आलीय.

एमपीएससीच्या परीक्षेत आपण यशस्वी झालो हे वृत्त कळल्यानंतर माधुरी हिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. खरंतर हे आनंदाचे अश्रू होते. आपण केलेल्या संघर्षाचं हे फळ आहे, असा विचार तिच्या मनात आला. तसेच यावेळी आपल्यासोबत आपले वडील असायला हवे होते. ते का नाहीत? या विचारांनी ती अस्वस्थ झाली. तिला आजही आपल्या वडिलांची आठवण येते. वडील आपल्यासोबत आज असायला हवे होते, असं तिला नेहमी वाटतं. तिला प्रत्येक क्षणाला आपल्या वडिलांची कमतरता जाणवत राहते.